#रेणूरसोई
#मोदक #उकडीचे
उकडीचे मोदक
विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻
बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक...
घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात...
आज बघु या उकडीचे मोदक...
साहित्य...
1 वाटी... 150 मिली.
*तांदूळ पिठी... 1 वाटी
*पाणी... 1 वाटी
*मीठ... 1/4 टिस्पून
*तुप... 1 टिस्पून
*ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून
*गुळ चिरून... 1/2 वाटी
*वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक)
कृती...
*एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी.
*एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे .
*उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी.
*गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे .
* नंतर उकड एका परातीत काढून छान दहा मिनिटे तरी मळून घ्यायची.
*मग एक सारख्या आकाराच्या लाट्या करून, एक एक लाटी तांदूळ पिठाच्या मदतीने पोळपाटावर पुरीसारखी लाटायची.
*मध्यभागी दोन चमचे सारण भरून, शक्य तितक्या जवळ पाकळ्या घ्यायच्या.
*पाकळी करताना अंगठा व मधले बोट बाहेर व तर्जनी आत मध्ये... पाकळी शक्यतो वरून खालपर्यंत करायची... सगळ्या पाकळ्या करून झाल्यावर हलक्या हाताने सगळ्या पाकळ्या जवळ आणून तोंड बंद करायचे
* अशाप्रकारे प्रत्येक गोळ्यात खोबऱ्याचे सारण भरून मोदक करून घ्यावे .
*एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून त्यावर एक चाळणी ठेवा. त्या चाळणी मध्ये केळीचे पान किंवा पांढरा स्वच्छ रुमाल ओला करून ठेवावा.
*त्या केळीच्या पानावर मोदक ठेवताना प्रत्येक मोदक आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्या मोदकाचा चा तळ फक्त बुडवून मग चाळणीत ठेवावा.
*आवडत असल्यास प्रत्येक मोदकावर पाण्याच्या बोटाच्या साह्याने एक एक केशर काडी ठेवावी.
*चाळणीवर किंवा स्टीमर मध्ये बारा मिनिटे वाफवावे .
*गरमागरम मोदक साजूक तूप घालून आनंद घ्या.
Comments
Post a Comment